मोठेपणा याचा अर्थ लक्षात ठेवला पाहिजे. समाजात मोठेपणा असाच मिळत असतो, कि ज्या वेळेला लोकांना त्याचं आपण अनुकरण करावं असं वाटतं, त्या वेळेला लोकांनी त्या मोठेपणाला दिलेली हि एक मानवंदना असते.
(.. पु. ल. )
हार्मोनियम वादक पु. ल.
संगीताबद्दलची माझी उपजत आवड लक्षात
आल्यावर माझ्या वडिलांनी मला पेटी आणून दिली. पेटी वाजवण्याच्या या
नादातून मी जरी गोविंदराव टेंबे झालो नाही तरी एक उत्तम श्रोता मात्र झालो.
पेटीवादनाचे जाहीर कार्यक्रम केले नाहीत, पण भावगीतं म्हणतांना हातात
पेटी घेऊनच गायलो. गाण्यांना चाली लावतांना आणि संगीतदिग्दर्शन
करतांना पेटी खूप उपयोगी पडली.
अनेक थोर गायकांच्या मैफिलींत पेटीची साथ करण्याचं भाग्य मला लाभलं.
पुढील आयुष्यात मला ज्या थोर गायकवादकांचा स्नेह, सहवास आणि
आपुलकी लाभली, त्यांच्याशी सुखसंवाद साधता आला त्याचं बरंचसं श्रेय
या संवादिनीलाच द्यायला हवं.