| पी. एल.- एक
साहित्य, संगीत अकादमी
पद्मश्री पु. ल. देशपांडे उद्या पंचाहत्तरव्या वर्षात पदार्पण
करत आहेत. सत्कार सभेत वक्त्याने हे वाक्य उच्चारले तर पांढरे
पागोटे, लांब पिवळा कोट, त्याच्यावर उपरणे, छपरी पांढऱ्या मिशा
व चष्मा असा पी.एल. मला दिसायला लागेल. अशा गंभीर माणसाबरोबर इतकी
वर्ष माझी जवळीक राहिली असती का? पी.एल. ला गंभीर मी तरी कधी पाहिला
नाही. उतारवयातील शारीरिक आजारानंतरसुध्दा आजही तो मनात मिश्किल
आणि वात्रट आहे. याचा अर्थ वय हे मनावर अवलंबून नसतं. कॅलेंडरची
पानं उलटली म्हणून त्याच्या वयाला ७५ वर्ष झाली, हा कालनिर्णय
आपण ठरवतो. तसा तो अजून मनानं पंचविशीतलाच आहे.
मित्रांची मैफल ही आमची रास आणि नाटक हे आमचं वेड म्हणून ४५
वर्षापूर्वी आम्ही एकत्र आलो. वसंत सबनीस यांच्या खोलीवर भरलेल्या
मित्रांच्या मैफलीत त्यानं माझी, 'शऱ्या, हा पी.एल. देशपांडे
आणि पी.एल. हा शरद तळवळकर' असा आमचा परिचय करून दिला. त्यावेळी
'अरे वा, कानामात्रा नसलेला माणूस दिसतो आहे,' असा पी.एल.ने
माझ्याबद्दल आपला अभिप्राय व्यक्त करताच मैफलीत एकच हशा झाला.
पी.एल.च्या वक्तव्यावर मी ऐकलेला तो पहिलाच हशा. पुढे अशा हशांत
आमच्या अनेक मैफ़ली रंगल्या.
आमच्यापैकी कोणीच मालदार नव्ह्ते. मध्यमवर्गीय सामान्य जीवन
हीच आम्हा सर्वांची परिस्थिती होती. दोन शर्ट, दोन पायजमे, एक
कोट हा प्रत्येकाचा वार्डरोब होता. तरी चौकोनी चेहरा करून कसे
होईल हा कोणाच्याही लेखी विचार नव्हता. वेळ असेल तेव्हा वर्गणी
करून चारआठ आणे जमवायचे, भत्ता आणायचा भत्ता म्हणजे चुरमुरे,
फुटाणे, खारेदाणे त्यात कांदा कापून घालायचा आणि त्या आहाराबरोबर
गप्पांची मैफल सुरू व्हायची, ती चार तास चालायची. त्यावेळी चारआठ
आण्यांत ढीगभर भत्ता यायचा. पारतंत्र्यातील सुबत्ता होती. आता
चार आण्यांत चार शेंगांचे दाणेसुध्दा मिळत नाहीत. सुरूवातीला
'अरे एवढा भत्ता कशासाठी' म्हणणारा एखादा मित्र गप्पांच्या रंगात
रंगला की भत्ता संपला तरी खाली सांडलेले चुरमुऱ्याचे तुकडे वेचताना
दिसायचा.
आमच्या वेळचे गणेशोत्सव म्हणजे संगीत उत्सवच असायचे. प्रत्येक
गणपतीपुढे संगीताची कारंजी उडायची. रास्ता पेठ गणपतीपुढे हिराबाई
गात असल्या, तर वज्रदेही गणपतीपुढे मास्तरांची मैफल भरायची.
मा. दीनानाथ, सरस्वती राणे, मोगुबाई कुर्डीकर, सुदेश बाबू; एवढेच
काय रोशनआरा बेगमही दगडूशेठ गणपतीपुढं हजेरी लावत असायची. आमचे
मित्रमंडळ या सुरांचा आस्वाद घेत दहा दिवस रात्री दोन वाजेपर्यंत
हिंडायचे. परत जाताना कार्यक्रमावर व रस्त्यांच्या कडेला झोपलेल्या
लोकांच्यावर पी.एल.चे मिस्किल मत, ही एक और खासीयत असायची. एकदा
असेच आम्ही परतत होतो. रात्री दीडचा सुमार होता. पी.एल.ला जिमखान्यावर
सोडायचं, असं आम्ही ठरवलं. लकडी पुलावर आलो. त्या निशःब्द शांततेत
विनायकबुवा पटवर्धनांच्या गाण्याचे सुर स्पष्ट ऐकू येत होते.
मी पी.एल.ला म्हटलं, 'पी.एल. विनायकबुवांचं गाणं जवळ कुठं तरी
दिसतय.' त्यावर पी.एल. म्हणाला, 'शऱ्या, जवळ कुठं म्हणजे ठाण्याला
किंवा कल्याणला असणार.' यात बुवांच्या गाण्याबद्दल सगळं काही
आलं. आम्ही प्रचंड हसलो.
तो मैफलीत असला, की खास काही विनोद झाला नाही असं होतच नसे.
पी.एल.नं 'गुळाचा गणपती' हा चित्रपट काढला, त्यावेळी तो गोपाळ
गायन समाजाशेजारच्या एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहत होता.
एका रविवारी मी, वसंत देशपांडे (गवई) व पी.एल. त्याच्या घरी
गप्पा मारत होतो. आमची मैफल ऐन रंगात आली असता एक मध्यमवयीन
गृह्स्थ एक भली मोठी वही घेऊन आले. त्यांच्या वयाकडे बघून त्यांना
'जा' म्हणणं शक्य नव्हतं. पी.एल. म्हणाला, 'या, काय काम आहे?'
त्यावर तो गृहस्थ म्हणाला, 'माझ्या मते कै. गडकऱ्यांचं 'एकच
प्याला' हे नाटक दोन तृतीयांश बरोबर असून एक तृतीयांश चूक आहे.
ते एक तृतीयांश सुधारून मी लिहून आणलंय.' त्याचे विधान धार्ष्ट्याचे
होते. पी.एल. म्हणाला, 'वही ठेवून जा. वाचून मी कळवीन.' त्यावर
तो गृह्स्थ म्हणाला, 'मी यवतमाळहून आलो. आत्ताच आपण वाचलात तर
बरं होईल.'
'एक आफ़तच आली' या नजरेनं पी.एल.नं माझ्याकडे आणि वसंताकडे पाहिलं.
मला हळूच डोळा मारला. अर्थ हा, की बघ याला कसा कटवतो ते. पी.एल.नं
वहीचं पहिलं पान उघडलं व त्यावरील मजकूर वाचला. 'संगीत एकच प्याला',
लेखक राम गणेश गडकरी एवढं वाचून पी.एल. त्या गृहस्थाला म्हणाला,
'काय हो, एक तृतीयांश तुम्ही कुठं सुधारलंय ?' तो गृहस्थ म्हणाला,
'आपण पुढे वाचा ना.' त्यावर पी.एल. म्हणाला 'अहो, पहिल्यापासून
एक तृतीयांश बदलायला पाहिजे. 'राम गणेश किल्लेदार' असं करायला
पाहिजे.' त्या गृह्स्थानं वही उचलली आणि पुढचा दरवाजा गाठला.
आम्ही पी.एल.च्या भाष्यावर प्रचंड हसलो.
प्रत्येक प्रसंगी त्याचा रिमार्क हा विनोदी तर असायचाच, पण
काही तरी सांगून जायचा. असेच आम्ही रात्री एका कार्यक्रमावरून
परतत होतो. आम्ही लकडी पुलावर आलो. मध्यरात्र झाली होती. शेजारच्या
स्मशानात एक मृतदेह जळत होता. बरीच गर्दी जमली होती. मी पी.एल.
ला म्हटलं, 'कोणीतरी मोठा माणूस गेलेला दिसतो आहे. गर्दी बघ
किती झाली आहे.' यावर पी.एल. म्हणाला, शऱ्या, तो मृतदेह नाही.
तिथं दत्ता धर्माधिकारींचं शूटिंग चाललं आहे.' त्याला धर्माधिकाऱ्यांच्या
चित्रपटाबद्दल काय म्हणायचं होतं ते त्यानं विनोदानं सांगितलं.
'पेडगावचे शहाणे' हा राजाभाऊ परांजपे यांचा चित्रपट भानुविलासला
लागल्यावर दररोज संध्याकाळी राजाभाऊ परांजपे, राजा ठाकुर, बाबा
पाठक, बाळ चितळे वगैरे चित्रपट संबंधितांचं मंडळ भानुविलासवर
जमू लागलं. मी त्या मंडळात असायचो. पी.एल. भानुविलासवर येऊ लागला.
'पेडगावचे शहाणे' हा पुन्हा पुन्हा पाहावा असा चित्रपट होता.
एकदा संध्याकाळच्या प्रयोगाला मी आणि पी.एल. थिएटरमध्ये बसलो
असता थिएटरचे मालक रामभाऊ अभ्यंकर पी.एल. शेजारी येऊन बसले.
वरच्या पत्र्याला भोक पडल्यामुळे सूर्याचे कवडसे पडद्यावर, आजूबाजूच्या
काळ्या कापडावर पडले होते. ते पाहून पी.एल. रामभाऊ अभ्यंकरांना
म्हणाला, 'भानुविलास हे अगदी सार्थ नाव तुम्ही थिएटरला दिलंत.
तुमचं खरंच कौतुक आहे.' यात रामभाऊंची टिंगल असूनही, रामभाऊ
मनसोक्त हसले. हेच पी.एल.च्या मिश्किल रिमार्कचे वैशिष्ट्य आहे.
'तुका म्हणे आता' हे त्याचे पहिले नाटक. काही व्यावसायिक व
हौशी कलावंत घेऊन त्यानं ते बसवलं. त्या नाटकात वसंत सबनीस शिवाजीची
भूमिका करीत होता. आधीच तो उंच आणि जिरेटोपात त्याची उंची खूपच
वाढली होती. त्याचा पहिला प्रयोग भानुविलास नाट्यगृहात होता.
मी पी.ल.शेजारी पहिल्या रांगेत प्रयोग पाहत होतो. प्रयोग संपल्यावर
पी.ल. नं मला विचारलं, ' शऱ्या नाटक कसं वाटलं? मी म्हणालो,'
जरा मोठं वाटतंय. थोडी काटछाट करावी, असं मला वाटतं.' यावर पी.ल.
म्हणाला, 'तुझे म्हणणं अगदी बरोबर आहे. शिवाजी दोन फूट कापला
पाहिजे.'
तो रसिकतेचा उत्तम जाणकार आहे. पूर्वी पुण्यात स्थानिक नाट्यसंमेलन
भरत असे. एका संमेलनाचा तो अध्यक्ष होता. त्या संमेलनात रात्री
'सौभद्र' नाटक होतं. त्या काळानुसार स्त्री भूमिका पुरूषच करीत.
त्या सौभद्रात आम्ही शेजारी बसलो होतो. रूक्मिणीची भूमिका गंधर्व
कंपनीतील शंकरराव कुलकर्णी करीत होते. त्यांची नखऱ्याची ख्याती
अशी, की वृंदावनाला प्रदक्षिणा घालताना तिसऱ्या प्रदक्षिणेला
ते टाळीच घ्यायचे. ती टाळी तर पडली होती; पण कृष्णरूक्मिणीचा
लव्हसीन सुरू झाल्यावर 'नच सुंदरी करू कोपा' या गाण्याला त्यांनी
अप्रतिम अभिनय केला. पी.एल. सारखा मागे बघत होता. मागे सर्व
म्हातारे व वयस्क प्रेक्षक होते. त्यांचा उत्साह अनिवार होता.
तो पाहून पी.एल. म्हणाला, 'शऱ्या, आपल्या पूर्वीच्या पीढ्या
खऱ्या रसिक होत्या. अरे, 'कुच भल्ली वक्षाला । टोचून दुखवी मजला'
या ओळींना मागे बघ काय आनंदाचं उधाण आलं आहे. आता ते कुच कापडाचे
आहेत, हे काय त्यांना माहीत नाही; पण तरीही ते त्यात रस घेताहेत.
लेका ही खरी रसिकता.'
- शरद तळवलकर
... अपूर्ण
(रविवार सकाळ, ७ नोव्हें. १९९३)
|