मोठेपणा याचा अर्थ लक्षात ठेवला पाहीजे. समाजात मोठेपणा असाच मिळत असतो, कि ज्या
वेळेला लोकांना त्याचं आपण अनुकरण करावं असं वाटतं, त्या वेळेला लोकांनी त्या मोठेपणाला दिलेली ही एक मानवंदना असते.
(.. पु. ल. )
 

आमच्या एका मित्राने पु.लं.ना त्याच्या घरी जेवायला बोलावले होते. तो पु.लं.ना म्हणाला, 'तुम्हाला सगळयात जास्त काय आवडतं?' पु. ल. म्हणाले, 'माणसं !'
असं उत्तर फक्त पु.ल.च देऊ शकत होते. आणि ते खरंच होतं. माणसांवर पु.लं.चं मनापासून प्रेम होतं. तो जर चार्ली चॅप्लीनसारखा कलावंत असेल, बाबा आमट्यांसारखा समाजसेवक असेल, किंवा सीमेवर प्राणपणाने लढणारा सैनिक असेल, तर त्याच्या कर्तुत्वाने पु.ल. भारावून जात. त्यांनी कधी कुठल्या देवाला नमस्कार केला नाही, तो त्यांना अशा कर्तुत्ववान माणसांमध्ये दिसला. बालगंधर्व दिसले कि पु.ल. भक्तिभावाने वाकून नमस्कार करीत.
परदेशात चार्ली चॅप्लीनचे दर्शन होताच त्यांच्या डोळयांत पाणी आले आणि त्यांनी दुरुनच हात जोडले ! 'वंगचित्रे' मध्ये टागोरांशी आपली ओळख करुन देताना ते सांगतात, 'सकाळी सुंदर कविता लिहिणारा हा कवी दुपारी 'मलेरिया निर्मूलना'च्या प्रचाराचे लेख लिहीत होता.' अशी अनेक कर्तुत्ववान माणसे पु.लं.ची श्रद्धास्थाने होती.
त्यांच्या कार्याची ओळख आपल्याला पु.लं.नीच ठिकठिकाणी करुन दिली आहे. किंबहुना ही माणसे आपल्याला जी काही थोडीफार कळली, ती पु.लं.मुळेच, असंही म्हणायला हरकत नाही.



पुलकित
First time uploaded on 15/04/2001 फाँट मदत आभार Please read:Disclaimer Last time updated on 12/06/2009