|
सुनीताबाई देशपांडे यांचे दु:खद निधन. पु. लं. च्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच त्यांचे निधन व्हावे हा योगायोग म्हणावा कि काय ते कळत नाहीये. सुनीताबाई पु. लं. च्या खरोखरीच्या जिवाभावाच्या जोडीदारीण होत्या. पु. ल. अनेक प्रसंगी भावविवश होऊन जायचे. पण सुनिताबाई त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या. अनेक लोकांना त्या आवडत नसत. पु. लं. चा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना त्या कटाक्षाने त्यांच्यापासून दूर ठेवत असत.
कित्येकदा माणसं अपयशापेक्षा सुद्धा यशानेच मुर्दाड बनतात. पण पु. ल. व सुनीताबाई यशामुळे कधीही हुरळून गेले नाहीत. समाजाने आपल्याला जे काही दिले आहे ते स्वत:जवळ न ठेवता त्याचा उपयोग समाजातील गरजू लोकांसाठी ह्या दोघांनी वेळोवेळी केला. पण हे करत असताना त्यांनी कसलाही गाजावाजा केला नाही. मदत करताना आपले नाव जाहीर होणार नाही ह्याची खात्री करून मदत केली. सुट्टी नाणी भरपूर आवाज करतात परंतु नोटा कधीही आवाज करत नाहीत. यश मिळवणं आणि ते पचवणं ह्या सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. यश अनेक लोकं मिळवतात पण ते पचवणं फार थोड्या लोकांना जमतं.
पु. लं. चे शब्दावरील प्रभुत्व हे वादातीत होते. कित्येकदा लोकं लेखणी आणि तलवार ह्यांचे घनिष्ठ संबंध जोडतात. आणि ते खरंही असेल कदाचित परंतु माझ्या मते तलवारीने माणूस आडवा करणं सोपं असेल परंतु लेखणीच्या सामर्थ्याने माणूस उभा करण्याची किमया ह्या जोगीयाने केली आहे. व्यक्ती आणि वल्ली मधली अनेक काल्पनिक पात्रे त्यांनी केवळ लेखणीच्या जोरावर जिवंत करून दाखवली. मलाच काय पण व्यक्ती आणि वल्ली वाचलेल्या लाखो लोकांना हाच प्रश्न भेडसावत असेल कि पु.लं. ना हे लोक खरोखरी भेटले असतील का? माणूसच काय परंतु लेखणीच्या जोरावर त्यांनी दगडाविटांची तीन मजली चाळ उभी केली, व त्या चाळीतलं प्रत्येक पात्रं जिवंत करून दाखवलं. चितळे मास्तर, अंतू बरवा, रावसाहेब, हरितात्या यांसारखी असंख्य पात्रे हसवता हसवता शेवटी डोळ्यांच्या कडा भिजवून गेली. साहित्य, काव्य, संगीत, अभिनय व इतर अनेक कलांचं हे अधिष्ठान होतं. अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा ह्यासारखी प्रवासवर्णनं वाचून त्या त्या देशात नकळत त्यांच्याबरोबर सफर घडवून आणली.
जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळाले हो, जीवन त्यांना कळले हो.... मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो.... कविवर्य बा.भ.बोरकरांच्या ह्या कवितेचा खरा अर्थ पु.ल. आणि सुनीताबाई ह्यांच्याकडे बघून तंतोतंत पटतो.
ज्या माणसाने शब्दांवर वादातीत हुकूमत गाजवली त्या शब्दांच्या अनभिषिक्त सम्राटाला व त्यांच्या सहधर्मचारिणीला माझ्यासारख्या एका सामान्य माणसाने वाहिलेली ही शब्दांजली......
|