|
पु.लं.च्या पेटीविषयी ऐकण्याची माझी खूपच उत्सुकता होती. "भास्कर संगीत विद्यालयात राजोपाध्ये म्हणून मास्तर होते, त्यांच्याकडे आम्ही शिकायला जायचो. आमच्याकडे एक असा नियमच होता, वडील संध्याकाळी ऑफिसमधून आले, की ७ ते ८ भाई पेटी वाजवायचा आणि मी तबल्यावर साथ करायला. पण एक तास पेटीचा रियाझ झाल्याशिवाय आम्ही जेवायला बसत नसू. आमची आईसुद्धा ऐकायला बसत असे. वडील बसत असत. आई चांगली गायची सुद्धा. पेटीची आणि सूरांची ओढ भाईला लहानपणीच लागली. पेटीतर त्यानी ऐकूनच वाढवली. दरवर्षी त्या क्लासचा समारंभा व्हायचा. त्यात कार्यक्रम व्हायचे. एका कर्यक्रमाला बालगंधर्व आले होते. भाई तेव्हा पेटी वाजवायला बसला. त्यांनी कुठलं तरी नाट्यगीत वाजवलं होतं. गंधर्व खुर्चीवरुन उठले आणि भाईच्या समोर येऊन बसले. त्यांनी ते इतकं मन लावून ऐकलं, आणि संपल्यावर भाईच्या पाठीवर शाबासकी दिली! ती पेटी त्यानी पुढे आयुष्यभर सुरु ठेवली. जपली, वाढवली."
२२ रु. ला घेतलेली पेटी, आणि ३ रु. ला घेतलेल्या तबल्याची आठवण उमाकांत काकांना अजून आहे. तो तबला त्यांनी अजूनही आठवण म्हणून जपून ठेवला आहे.
"गाणी ऐकायला आणि नाटकं बघायला वडीलांनी कधीही अटकाव केला नाही. रमाकांत अगदी लहान होता. भाईला आणि मला घेऊन वडील शनीवारी ऑपेरा हाऊसला जायचे. रात्रीचं नाटक असे. बालगंधर्व, मा. कृष्णराव सगळ्यांना स्टेजवर आम्ही शाळकरी वयात होतो, तेव्हा पाहिलं आहे. रात्री पार्ल्याला परत यायला गाड्या नसायच्या. १-१:३० वाजता नाटक संपलं, की मराठा हायस्कूल मध्ये बाक ओढून मी, भाई आणि वडील आम्ही तिघेही झोपायचो आणि सकाळी पहिली गाडी पकडून परत यायचो. पण वडीलांनी कधीही मनाई केली नाही. गणेशोत्सवातल्या सगळ्या गाण्यांना आम्ही न चुकता जात होतो. या सगळ्यासाठी वडीलांकडून, आईकडून खूप प्रोत्साहन मिळालं आणि त्याचा भाईनी खूप चांगला उपयोग करुन घेतला.
भाईकडे लेखन आलं, ते आजोबांकडून. आमचे आजोबा- ऋग्वेदी, यांनी त्या काळात बरंच लिखाण केलं होतं. 'आर्यांच्या सणांचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास' असं त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. आपले सगळे सण, त्यांची माहिती, त्यांचं महत्त्व असं बरंच अभ्यासपूर्ण आणि वेगळं पुस्तक होतं ते. टागोरांची गीतांजली त्यांनी संपूर्ण अभंगात रचली होती. त्यांचं शिक्षण कानडीत झालं होतं, पण मराठी लेखन करायचे ते. शिवाय गीतांजली वाचण्यासाठी म्हणून बंगाली सुद्धा शिकले. मग ती संपूर्ण अभंगात रचली आणि ते पुस्तक टागोरांना नेऊन दाखवलं. त्यामुळे लेखनासाठीचं प्रोत्साहन भाईला आजोबांकडून मिळालं.
भाषणाच्या बाबतीत सुद्धा वडील सांगत तुझं भाषण तूच लिहून काढलं पाहिजेस. वडीलांच्यामुळेच शाळकरी वयात भाईंच्या वकतॄत्व कलेला प्रोत्साहन मिळालं. मला शाळेत असतानाच त्यानी किर्तन सुद्धा लिहून दिलं होतं. अगदी पूर्वरंग, उत्तररंगासकट! 'बेबंदशाही' हे नाटक भाईनी स्त्री पात्र वर्ज्य करुन लिहिलं. आम्ही ते शाळेत असतांना सादर सुद्धा केलं होतं. भाई स्वत: संभाजी झाला होता. आम्हाला मावळे केलं होतं. (कारण मावळ्यांना भाषण नव्हतं.)
हे करु नको, ते करु नको, असं आम्हाला घरुन कधीही सांगितलं गेलं नाही. अभ्यासातही लक्ष असायचं, तसंच ह्या activities मध्येही. आईवडीलांचा यात खूप मोठा हात आहे.
भाईच्या उत्स्फूर्तपणा, वक्तृत्व या गुणांना यामुळे लहानपणीच प्रोत्साहन मिळालं. कुठेही काही कार्यक्रम झाले, खाडिलकरांनी पोवाडे म्हटले, की दुसऱ्या दिवशी आमच्याकडे पोवाडा. पुढे जे एकपात्री त्यानी केलं, ते तो लहानपणापासूनच करत होता."
एकपात्री वरून सहाजिकच 'बटाट्याच्या चाळी'चा विषय निघाला. उमाकांतकाका म्हणतात,'चाळीवर' ते एक पुस्तक लिहू शकतील एवढ्या आठवणी आहेत त्यांच्याकडे. अत्रे, नाथ पै, मामा वरेरकर अशा दिग्गज मंडळींनी 'चाळीच्या' प्रयोगाला दिलेल्या भेटीच्या आठवणी ते सांगत होते.
मामा वरेरकर दिल्लीहून खास प्रयोग बघण्यासाठी म्हणून आले होते. interval ला काही हवं का म्हणून विचारलं, तर म्हणाले, नको. तो दमला असेल. मी बसतो इथेच. आणि खुर्चीत बसून राहिले. मी भाईला जाऊन सांगितलं. त्यांना तुला भेटायचं आहे, पण म्हणाले तू दमला असशील. जरा वेळाने भेटतो. भाई म्हणाला, नाही नाही. मी येतो आत्ताच. भाई आला. तोपर्यंत लोक निघून गेले होते. मामा वरेरकर खुर्चीतच बसून होते. भाई आल्याबरोबर ये, बस म्हणाले. आपल्या शेजारी बसवलं आणि पाठीवरुन हात फिरवत म्हणाले, 'बाळा दमला असशील रे.' इतकं त्यांचं प्रेम होतं भाईवर. भाईनी रेडिओवरची नोकरी सोडल्याचं सगळ्यात जास्त वाईट वाटलं असेल ते मामा वरेरकरांना. मला न सांगता तू नोकरी कशी सोडलीस म्हणून त्यांना रागही आला होता. इतके प्रेमळ होते ते.
एकदा अत्रे 'चाळीच्या' प्रयोगाला आले होते, पण न भेटताच निघून गेले. भाईला वाटलं त्यांना प्रयोग आवडला नसेल. प्रयोग संपल्यावर रात्री आम्ही सगळे भाईच्या घरी जायचो. तिथे जेवून वगैरे गप्पा मारत बसलो होतो. १-१:३० वाजता फोन वाजला. भाईनी फोन उचलला. कानाला लावला. आम्ही सगळे बघत होतो. 'मी बाबुराव अत्रे बोलतोय. आत्ताच तुझ्यावर अग्रलेख लिहून संपवला आहे. आता मी मरायला मोकळा.' आणि खरोखरीच त्यांनी दुसऱ्या दिवशी मराठा मध्ये 'चाळी'वर चार कॉलमचा अग्रलेख लिहिला! तो अजूनही 'टिळक मंदिरात' ठेवला आहे.
'बटाट्याची चाळ' नंतर, 'पु.ल.देशपांडे सहकुटुंब सहपरिवार'.. 'वराती'च्या प्रयोगाबद्दल ऐकायला साहजिकच आम्ही उत्सुक होतो.
रमाकांतकाका सांगायला लागले, "आम्ही सगळे नातलग, मित्र मिळूनच 'वाऱ्यावरची वरात' करायचो. भाई, वहिनी, मी, काही दिवस उमाकांत, माझा एक भाचा, एक बहीण आणि आमची इतर सगळी मित्र-मंडळी सुद्धा अगदी घरच्यासारखीच. आमची अशी नाटक कंपनी वगैरे नव्हती. सगळे घरचेच. त्यामुळे वातावरण सुद्धा खेळीमेळीचं असायचं. आणि प्रयोग सुद्ध कसे, तर दररोज व्हायचे. 'असा मी असामी' चा प्रयोग सुद्धा भाईनी १५ दिवस सलग केला आहे. 'वराती'च्या वेळेला प्रत्येकाची नोकरी धंदा यामुळे आम्ही शनिवार, रविवार सलग पाच प्रयोग सुद्धा केले आहेत. शनिवारी २ प्रयोग आणि रविवारी ३ प्रयोग.
तेव्हा आम्ही सगळे खूप काही actor वगैरे नव्हतो. पण एकत्र मिळून करायचो. आता लालजी देसाई, त्याला स्टेजवर जाऊन एक वाक्य बोलता येत नाही. स्टेजवर गा म्हटलं तर गाईल, पण नाटकात काम कर म्हटलं तर शक्य नाही. भाईनी सांगितलं, मी तुला असं काम देतो, की त्यात फक्त तुला गायला लागेल. वाक्य दोन-चारच असतील. आणि मग त्याला 'देसाई मास्तर'चं काम दिलं ती ४-५ च वाक्य होती काहितरी. पण ती सुद्धा तो बिचार पाठबिठ करुन म्हणत असे. श्रीकांत मोघे, दत्ता भट, शशी झावबा हे सगळे मित्रच होते त्याच आमचे.
आमचा एक भाचाही होता. त्याल नुसतं येऊन बसायचंच काम होतं. कोणीतरी गावातला वगैरे माणूस म्हणून. बोलायचं काही नव्हतं. मग तो आपला येऊन नुसता बसायचा. म्हणजे अशी सगळी घरचीच मंडळी होती. लालजी देसाईला तसं फक्त गायचंच काम होतं. आणि ४-५ वाक्य. पण एकदा त्याला यायला उशीर होणार होता, म्हणून भाईनी त्याला मुंबईहून पुण्याला विमानानी नेला. भाईची प्रत्येकालाच अशी घरच्यासारखी treatment होती. त्यामुळे ते ही सगळे फार खूष असायचे. आणखी एक जण म्हणजे मधू गानू. जो भाईचा आयुष्यभर सेक्रेटरी म्हणून राहिला. आणि अजूनही वहिनीला मदत करतो. पुरुषोत्तम मंत्रीसारखा ऑफिसरसुद्धा धोब्याचं काम करायचा वरातीत. नीला देसाई (नीलम प्रभू), विजया मेहता असे आम्ही सगळे जण एकाच कुटुंबातले असल्यासारखे होतो."
पु. लं.ना मिळालेली लोकप्रियता, रसिकांचे उदंड प्रेम याचेही अनेक किस्से या दोघांकडे आहेत. उमाकांत काका अगदी भाईंसारखे दिसत असल्यामुळे फसलेलेही बरेच लोक आहेत. त्यांनी एक किस्सा सांगितला. "आम्ही म्हैसूरला फिरायला गेलो होतो. एक ठिकाणी तलावाजवळ उभे होतो. तिथेच मला वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर भेटले. आम्ही तिघेही बोलत होतो. तेवढ्यात एक फोटोग्राफर धावत आला आणि दोघांना म्हणाला, "तुम्ही दोघे बाजूला व्हा. मला पु.लं.चा फोटो घ्यायचा आहे." वसंत बापटांनी डोक्याला हात लावून सांगितले, हा पु.लं.चा भाऊ आहे. मी वसंत बापट आणि हे पाडगावकर आहेत.
तसंच एकदा पार्ल्यात रस्त्यावरुन फिरत असतांना पु.लं.चे भाऊ म्हणून मला एका साऊथ इंडियन माणसाने अक्षरश: साष्टांग नमस्कार घातला होता."
उमाकांत आणि रमाकांत काका आठवणींची एकेक लड उघडत होते. आम्ही ज्या खोलीत बसलो होतो, त्या खिडकीबाहेरुन निरनिराळ्या पक्ष्यांचे गोड आवाज पार्श्वसंगीताचं काम करत होते. आणि त्या काळचं ते घर, वातावरण याची कल्पना येत होती. त्या खिडकीबाहेरची ती झाडं, आम्हीसुद्धा या सगळ्याचे साक्षीदार आहोत बरं का! असंच जणू सांगत होती.
शब्दांशी लीलया खेळणारा, सुरांच्या हातात हात घालून चालणारा, जीवनातला प्रत्येक क्षण अक्षरश: जगलेला आणि मराठी माणसाच्या गळ्यातला ताईत बनलेला तो जादूगार... त्याच्या आठवणी एका तासात थोडीच संपणार होत्या? पण त्यातल्या ज्या काही आमच्या वाट्याला आल्या, त्या मात्र आमची 'पुलकित' संध्याकाळ सोनेरी करुन गेल्या. - स्मिता मनोहर.
(श्री. उमाकांत व रमाकांत काकांच्या प्रेमळ सहकार्याबद्दल, आम्ही त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. ही 'पुलकित' संध्याकाळ सौ. अनुराधा देशपांडे यांच्यामुळे शक्य झाल्याने त्यांचे आभार शब्दात मांडणे शक्य नाही. आमचा मित्र मनोज प्रभू याची मदत सुद्धा खूप मोलाची होती.)
- स्मिता.
|