| पुलंनी
मला काय दिलं?
'तुमच्या आमच्या जीवनातली सुखदु:खांची फुलं
मनाच्या अंगणात शिरुन वेचतात एक 'पु.ल'
एकमेकांत गुंफुन त्यांचे करतात सुंदर हार
विनोदाच्या धबधब्यात अश्रूंची एखादी धार!' शिखांचे
'शिखपण' ज्याप्रमाणे पाच 'क'कारांनी सिध्द होतं,तसंच अस्सल मराठी
माणूस हा पांडुरंग, पुलं,पेन, पुरणपोळी आणि पिशवी ह्या पाच 'प'कारांनी
ओळखावा असं विधान केल्यास कुणाची हरकत नसावी!
स्वातंत्र्योतर काळात चिखलगाळात रुतलेल्या दलित बांधवांच्या दु:खाला वाचा फोडणारे अनेक लेखक त्याच समाजांतून वर आले, राजकारणावर भाष्य करणारे आणि मोठ्या व्यक्तीचे गुणगान करणारे लेखकही कमी नव्हते. अशावेळी, अगदी पुलंच्याच शब्दात सांगायचं झालं तर ट्रॅमचा आणा वाचवून त्यात मेथीची जुडी बसवणाऱ्या' आप्पा, अण्णा, बापू, नाना, तात्या अशी नावं धारण केलेल्या पापभीरु मराठी मध्यमवर्गीय नोकरदाराला छापील पुस्तकात प्रथम स्थान दिलं ते पुलंनीच!'
माणसाला कुठलंही पूर्वग्रहदूषित 'लेबल' न लावता त्याच्याकडे निव्वळ एक वल्ली म्हणून बघण्याच बाळकडू पुलंनी मला दिलं. नाथा कामत जसा तरुणींना 'वाचत' जातो; त्याप्रमाणे माणसांना वाचण्याचा जणू छंदच मला लागलाय. प्रत्येकाचा स्वभाव, तऱ्हेवाईकपणा आणि त्यात कुठेतरी दडलेला चांगुलपणा रोजच्या कंटाळवाण्या 'रुटीन'मध्ये आनंदाची, गमतीची पखरण करु लागलाय. अर्थात हे 'वाचन' म्हणजे 'टीका' नव्हे, ही 'पुरुषोत्तम लक्ष्मणरेखा' कायम घालून दिलेली आहे. समाजातल्या कुठल्याही घटकाला 'टाकाऊ' न मानता त्याबद्दल एकही वावगा शब्द न लिहिता त्याचं अंतर्बाह्य चित्रण करणं हे पुलंचं वैशिष्ट्यच आहे. उदाहरणार्थ हॉंगकॉंगमधल्या वारयोषितांवर एका शब्दाने ही तोल ढळू न देता त्यांनी किती ह्रदयद्रावक आणि संयत लिखाण केलंय.किंवा पांढरपेशी उपचाराचे नियम झुगारणारा नामू परीट असो वा दारुची भट्टी लावणारा बबडू असो. जपानमध्ये भेटलेली गेयशा असो किंवा अमेरिकन दारुड्या असो. एखाद्याच्या रंगरुपाच्या किंवा सामाजिक पाश्वभुमीच्या पलिकडे जाऊन त्याच्या आतला सह्रुदय माणूस मला आता दिसतो.
माझ्या शहरी वागण्यावरुन तिरकस बोलण्याऱ्या कोकणातल्या माझ्या आजोबांच्या पोटातली माया मला जाणवते; ते पुलं मुळेच! एस.टी. तल्या गावरान सहप्रवाश्यांच्या कलकलाटाचा 'त्रास' आताशा होत नाही. शेजारी कोळीण येऊन बसल्यावर नाक बंद करावंस वाटत नाही; ते पुलं नी घेतलेल्या 'बौध्दिका'मुळेच.मोलकरणीने आणून दिलेली,तिच्या शेतातली वालांची ऊसळ मी आवर्जून चाखते. ड्रायव्हरशी बोलतांना झालेल्या कोटीवर त्याची 'टाळी' घेताना माझ्या मनात यत्किंचितही 'अढी' असत नाही.
'Small is Beautiful' ची प्रचिती मला पुलं इतकी चांगली कुणी दिलेली नाही. 'गणपती बाप्पा मोरया' ची मुक्त आरोळी 'पब्लिक' मध्ये ठोकण्याचं धाडस त्यांनी मला दिलं. पावसात भिजत कणिस खाणं, आजीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपणं, जेवणानंतर झोपेचे हल्ले परतवत गप्पांची मैफील जागवणं, नातेवाईकांचे हसून स्वागत करणं, भेंड्या खेळणं, आग्रहाने कोणाला जेवू घालणं, तसंच कुणाच्या आग्रहाला मान देऊन 'डाएट' बाजूला ठेवून दोन घास अधिक खाणं..... अशा कितीतरी फुटकळ वाटणाऱ्या गोष्टींत आनंदाचं किती मोठ्ठं भांडार आहे ते पुलंनीच मला उलगडून दाखवलं. सकाळी ८:४५ च्या चर्चगेट लोकलमधला प्रवास असो किंवा रात्रभर जागून केलेला अभ्यास असो, कुठलीही गोष्ट चक्क 'एन्जॉय' कशी करावी ही युक्ती मला पुलंनी सांगितली आहे; नाहीतर तापाने फणफणले असतांना कपाळावरच्या कोलन वॉटरचा थंडावा मी अनुभवला नसता. माशी, चष्मा, पाठ धरणं, रेल्वे प्लॅटफॉर्म अशा चिल्लर विषयांवर इतके अप्रतिम लेख लिहिण्याचं सामर्थ्य कुणातही नव्हतं.... नाहीये.
अनेक थोर व्यक्ती, celebrities पुलंच्या नजरेतून मला भेटल्या. त्यांची आत्मचरित्रं वाचूनही माझी त्यांच्याशी इतकी ओळख कदाचितच झाली असती. इरावती कर्वे, गुरुदेव टागोर,पं.कुमार गंधर्व, शिल्पकार फडके, भय्यासाहेब दाते.... कितीतरी. ह्या सर्वाच्या समोर मी नतमस्तक होण्यात, त्यांच्या स्वतःच्या चरित्रांइतकाच पुलंच्या लेखणीचा वाटा निश्चितच आहे! ह्या चमत्कारी लोकांबद्दल लिहितांना पुलंची प्रतिभा अधिकच सरसरत उफाळते... तरीही स्वतःला केवळ ' शब्दांचे किंकर' म्हणवून घेत त्यांच्या नम्रतेची आणि साधेपणाची झलक ते दाखवतात. ही झलक तुमच्या आमच्या सारख्या कःपदार्थ असणाऱ्याच्याही मनात डोकावणाऱ्या अहंकाराला शालजोडीतले हाणते!
माझ्या बाबतीत 'पु.ल. वाचल्याने देशाटन' ही नवी म्हण रुढ झाली आहे. पुलंनी मला खूप फिरवलं. अमेरिका,जपान, युरोप, रशिया... अगदी सगळीकडे; आणि ते ही घरबसल्या. तिथे मी प्रत्यक्ष जाऊनही एवढी मजा आली नसस्ती आणि इतकी माणसंही मला भेटली नसती. तऱ्हेतऱ्हेच्या संस्कृतींशी पुलंनी इतकी आत्मीतयतेने ओळख करुन दिली आहे की उद्या मी प्रत्यक्ष तिथे गेल्यावर 'जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत' असं मला वाटल्यास आश्चर्य नव्हे.' माणूस तितुका एकच आहे' हे पुलंनी इतक्या प्रभावीपणे माझ्या मनात ठसवलंय, की उद्या एखाद्या अमेरीकन मैत्रिणीकडे मी कदाचित टाळी सुध्दा मागेन. माझ्या बाबतीत घडलेला गमतीदार किस्साच सांगते.
स्थळः Internet वरील मराठी chat room;
प्रसंगः Japan मध्ये अस्सणाऱ्या मराठी महाशयांशी माझ्या गप्पा.
'काय रे, जपानात कुठेसा असतोस तू?' मी उत्सुकतेनी विचारलं,
'ते मी सांगून काय उपयोग? माझ्य शहराचं नावही तू ऎकलेलं असणं शक्य नाही!' इति 'तो'. अस्सं काय! इथे मी 'पूर्वरंग' कोळून प्यायलेय; आणि हा नरपुंगव मला जपानबद्द्ल माहित नाही म्हणतो चक्क ?.... माझ्यातली झाशीची राणी जागी झाली!
'पण नाव सांगितलंस तर काय जाणारे तुझं?' - मी.
'ठीक आहे. मी नाराला राहतो.'नारा'तला 'न' तरी ऎकलायस का कधी?' 'तो' मला खिजवत! 'तिथल्या deer park मधली हरणं बरी आहेत ना रे? आणि हो; सर्वात मोठ्या बुध्दमुर्तीला माझ्यातर्फे नमस्कार ठोक हं का !!!!'
नेपाळच्या पलिकडे न गेलेल्या मी, खास पुलंच्या पठडीतला बॉल वापरुन गुगली 'विकेट' घेतलेली असते. आणि पुढली पाच मिनीटं 'त्या'च्या तोंडातून (खरं तर हातातून !) शब्दही फुटत नाही. 'मी पण पु.लं.चा पंखा म्हणून नाव सांगते बच्चू !!!'
त्याची 'माते ! तू महान आहेस; मी लहान आहे. मला माफ कर,'- अशी संपूर्ण शरणागती.
तर सांगायचं म्हणजे, पुलंच्या जिवावर अशा कितीतरी प्रसंगात मी भाव खाऊन गेलेली आहे.
'मला गाणं ऎकण्यासाठी जगायचंय' असं पु.लं. नेहमी म्हणत. त्यांच्या ह्याच कलासक्तीचा वरदहस्त त्यांनी माझ्या डोक्यावर ठेवलाय. मनाला भावणारे सूर कानी पडले; की माझ्या तोंडून आपसूक दाद निघून जाते. मग ते YANNI चं पियानोवादन आहे; लतादीदींचं स्वर्गीय गाणं आहे, की हरीप्रसादांची बासरी आहे; ह्यात वाद उद्भवत नाही. घुंगुरांचा आवाज ऎकल्यावर मला स्वस्थ बसवत नाही. निसर्गानी रचलेली शिल्पं, हिरवाईने नटलेले पर्वत, घनगंभीर समुद्र, खळाळते झरे मला अंतर्मुख करतात. हातातली कादंबरी वा आत्मचरित्र माझी तहानभुख हरपवतात.स्वयंपाकघरातून येणारा खमंग वास, बल्लवाला मनातल्या मनात शरण जायला लावतो. रोमांकित करणारा सिनेमा किंवा नाटक पुन्हा पुन्हा पहावंसं वाटतं. एखादी सुंदर कविता मला सर्वांगानी आस्वाद घ्यायला लावते... कारण 'कविता हा माणसानं लावलेला सर्वात मोठा शोध आहे' असं भाईंनीच मला शिकवलेलं असतं.
सखाराम गटण्यासारखी साहित्याची गोडी मला लागण्याचं मुख्य कारण म्हणजे पुलंचं वाड़मय होय.साध्या मराठीतले वेगवेगळे भाषाप्रकार, त्यातील प्रादेशिक वैशिष्ट्यं, शाब्दिक खटके आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या भाषेत दडलेले भाव किती मोहक आणि interesting आहे हे पुलंच्या लिखाणामुळेच मला पटलं. बंगालीचा गोडवा, उर्दुतली नशा, मराठीतला परखडपणा, संस्कृत्मधली गेयता आणि इंग्लिशमधली लवचिकता माझ्या निदर्शनास आली. व्यक्तिचित्र, वगनाट्य, प्रवासवर्णन, भाषांतर, रुपांतर, संगीतिका, नाटक, समीक्षा, चिंतन हेच काय पण विडंबनासारख्या असंख्य साहित्यप्रकारांशी माझी गट्टी जमली. त्यातील प्रत्येकाला स्वतःचा चेहरा आणि स्वतःची मजा आहे, हे जाणवलं. पुलंची भाषणं वाचतांना प्रत्यक्ष त्यांच्याशी गप्पा मारल्याचा आनंद प्रत्ययाला येतो. त्यांच्या लिखाणातून आढळणाऱ्या पुस्तकांच्या नावांचा नुसता उल्लेखही त्यांचा थक्क करणारा व्यासंग दाखवतो. अगदी उपनिषदांपासून वुढाऊस पर्यंत. रवींद्रनाथांपासून शेक्सपीअर पर्यंत. तुकाराम ते अनिल अवचटांपर्यंत. ह्या सगळ्या लेखक कवी तत्ववेत्त्यांचं वाड़मय वाचण्याची मनिषा आणि धडपड ही 'जे जे मिळेल ते ते वाचावे | चित्ती असू द्यावी जिज्ञासा |' या पुलंनी मला बहाल केलेल्या वृत्तीमुळेच साध्य होते.
पुलंनी मला काय दिलं? अहो, पुलंनी काय दिलं नाही ते विचारा!
कधीही न पुसलं जाणारं हसु दिलं, साहित्याची, कलेची, ज्ञानाची आणि संगीताची शिदोरी दिली. निसर्गाची ओढ दिली. जिज्ञासेची जोड दिली. उत्स्फूर्तता दिली. माणसाला माणसासारखं बघण्याची दृष्टी दिली. जे जे उत्तम, उदात्त उन्नत आणि महन्मधूर आहे, त्याची आसक्ती दिली. माझ्या आंग्लाळलेल्या आचारविचारांचा कान धरुन बिमोड करुन मला माझ्या स्वत्वाची अस्तित्वाची जाणिव करुन दिली. माझ्या 'मराठीपणाची' समज आणि त्याचा सार्थ अभिमान दिला. 'उत्तुंग' महालातला 'पोकळपणा' आणि माझ्या लहानशा साध्या घरातली 'उत्तुंगता' माझ्या नजरेला आणून दिली. वेड्याबागड्या वारकऱ्यातल्या 'विठूरायाचं' दर्शन मला घडवलं. विश्वाच्या पसाऱ्यात नगण्य असलेलं आपलं आयुष्य एक निखळ आनंदयात्रा होऊ शकेल, हा विश्वास मला दिला. 'जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेचावे' हे स्वतःच्या कृतीतून मला शिकवलं. परिस्थितीने गांजून न जाता ह्या जगण्यावर ह्या जन्मावर शतदा प्रेम करण्याची उर्मी मला पुलंनी दिली.
परमेश्वर तरी इतकं भरभरून कुणाला देतो का हो?
पुलंची आठवण झाली की ओठांत हसू आणि डोळ्यात आसू येतात; आणि सहज मनात विचार तरळतो....
जीव ओवाळून टाकावा,
तर आयुष्यच पुरलं नसतं...
अशी माणसं नसती; तर
जगात काय हो उरलं असतं?
- प्रज्ञा अशोक जोशी (मुंबई) jpradnya@yahoo.com
|