दिनांक २४ ऑगस्ट २०११ रोजी च्या 'महाराष्ट्र टाईम्स' मधील
बातमी नुसार 'लोकमान्य सेवा संघ', 'पु.ल.गौरव दर्शन' बंद
करणार असल्याचा उल्लेख वाचल्यानंतर 'पु.ल.गौरव..' जतन करणे
आवश्यक असल्याने त्या संदर्भात 'लोकमान्य सेवा संघास' एक
खुले पत्र puladeshpande.net वर प्रसिद्ध करण्यात आले होते.
त्या संदर्भातली चर्चा 'लोकमान्य सेवा संघा'चे कार्यवाह
श्री. मोहन करंदिकर व सौ. स्मिता पुराणिक यांच्या बरोबर
८ सप्टेंबर २०११ रोजी झाली. त्यात झालेल्या चर्चेमध्ये श्री.
करंदिकर व सौ. पुराणिक यांनी 'पु.ल.गौरव दर्शन' हे कधीही
बंद होणार नसून ते नेहमीच पु.ल.प्रेमींना बघण्यासाठी खुले
राहिल असे सांगितले.
'लोकमान्य सेवा संघा'च्या वास्तूमधून 'पु.ल. गौरव..' कधीही
हलविण्यात येणार नसून रसिक व पु.ल.प्रेमी त्याचा आस्वाद
कधीही घेऊ शकतात हे स्पष्ट केले. पु.लं.च्या विषयीचा हा
ठेवा 'लोकमान्य सेवा संघा' कडे असल्याचा आम्हाला अभिमान
असून आम्हाला तो जतन करण्यात काही अडचणी नाहित, आणि असल्याच
तर त्या आम्ही दूर करतो आहोत, हेही स्पष्ट केले. 'पु.ल.गौरव..'
च्या स्थापनेपासून ते आजही तश्याच स्वरुपात टिकवण्याचा 'लोकमान्य
सेवा संघा'चा प्रयत्न सुरु आहे. काळानुरुप करावी लागणारी
दुरुस्ती व डागडुजी यांचेही काम सुरु केले आहे. कोणीही पु.ल.
प्रेमी कितीही वाजता 'पु.ल.गौरव...' ला भेट देण्यास आले,
तरी संस्थेच्या कार्यालयात त्यांनी संपर्क साधावा त्यांना
ते दाखवण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
केवळ चुकिची माहिती व गैरसमजुती वर आधारीत 'महाराष्ट्र
टाईम्स' मधील बातमीमुळे पु.ल.प्रेमींमध्ये या विषयावर
उलट सुलट चर्चा होणे स्वाभाविक होते, पण त्याच बरोबर ही
चर्चा करणाऱ्यांपैकी किती जणांना प्रत्यक्षात 'पु.ल.गौरव..'
विषयी माहिती आहे? व किती जणांनी मुंबईत असून सुद्धा 'पु.ल.गौरव...'
ला भेट दिली आहे? या महत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा यावेळी
चर्चा झाली.
'लोकमान्य सेवा संघा'ने puladeshpande.net ला सुरुवातीपासूनच
सहकार्य केले आहे, व पाठिंबा दिला आहे. यापुढे सुद्धा
पु.लं.च्या संदर्भात वेगवेगळे उपक्रम puladeshpande.net
व 'लोकमान्य सेवा संघास' सहकार्याने राबविता येतील व त्यासाठी
'लोकमान्य सेवा संघ' नेहमीच उत्सुक असेल असे श्री. मोहन
करंदिकर व सौ. स्मिता पुराणिक यांनी सांगितले.
या चर्चेला श्री. श्रीकांत जोशी (Retd. Joint Secretary
Govt. of Maha.) उपस्थित होते. श्री. श्रीकांत जोशी यांच्या
सहकार्यामुळे चर्चेला खूपच मदत झाली त्यामुळे त्यांचे
मन:पूर्वक आभार !
तसेच श्री. करंदिकर व सौ. पुराणिक यांनीही आमचे म्हणणे
ऐकून घेतले व त्यांची बाजू स्पष्ट केली, त्याचबरोबर puladeshpande.net
बरोबर अनेक उपक्रमांची चर्चाही केली त्याबद्दल त्यांचेही
अनेक आभार !
'पु.ल.गौरव दर्शन' विषयी अधिक माहिती येथे वाचता येईल.
स्मिता मनोहर
puladeshpande.net
|