|
आम्ही आणि आमची नातवंडे- मधू गानू
एकूण काय, सालं आयुष्य कोष्ठकात बसवता येत नाही. श्री. ना. पेंडसे यांच्या 'लव्हाळी' या कादंबरीतील या वाक्याचा मला पुरेपूर
अनुभव आहे. नाही तर वयाच्या छप्पनाव्या वर्षी, १९८५ साली, मीनाक्षीशी लग्न करून १९९१ साली 'आजोबा' होण्याचा मान आणि
आनंद मला कसा मिळाला असता?
मीनाक्षीची मुलगी सुप्रिया हिच्यामुळे हे भाग्य माझ्या वाट्याला आलं. पुढे तीन - चार
वर्षातच सुप्रियाचा मोठा भाऊ 'सचिन' यानेही
माझा आनंद द्विगुणति केला. ईशा, जनित, स्निग्धा, करण असा चार नातवंडांचा मी 'आबू' झालो. सचिन ग्रॅंट रोडला आपल्या काकांकडे राहत असल्यामुळे स्निग्धा आणि करण ची भेट आम्ही पुण्याहून मुंबईला जात असू तेव्हाच घडत असे.
मला आजोबा होण्याचा मान आणि आनंद सर्वप्रथम ईशाने दिला. तो दिवस होता १३ जुलै १९९१. आमची मुलगी सुप्रिया प्रसूत
होऊन घरी आली आणि त्या दिवसापासून माझी आणि ईशाची गट्टी जमली. तिचं नाव ठेवण्याआधीपासून ही गट्टी सुरू झाली.
सुरूवातीला अंगावर दूध पिऊन झाल्यावर ढेकर काढण्यासाठी तिला माझ्या खांद्यावर देत असत. तिचं डोकं मागे ठेवून मी फेऱ्या
मारीत असे आणि तिला ढेकर आली की माझं पोट भरल्याचा आनंद मला होत असे. सुप्रियाचं सासर- शानभागांचं घर आमच्या
समोरच्याच गल्लीत असल्यामुळे आमच्या घरीही ईशा हळू हळू मोठी होत होती. तिला खांद्यावर घेऊन मी बाहेर फिरायला पडलो
की, जाणाऱ्या - येणाऱ्या माणसांना ती एखाद्या पुढाऱ्याप्रमाणे दोन्ही हात जोडून मान वाकडी करून नमस्कार करीत असे.
सर्वांनाच या नमस्काराचं कौतुक वाटत असे. विशेषत: पु.ल. आणि सुनीताबाईंच्या घरी गेलं की त्या आवर्जून तिच्याकडून तो खास
नमस्कार करुन घेत. ईशाची बुध्दी तल्लख आहे. त्यामुळे लहानपणी तिला शिकवलेले श्लोक, अगदी 'वक्रतुंड महाकाय' सारखे संस्कृत
श्लोक सुध्दा ती घडाघडा म्हणत असे. संध्याकाळी देवासमोर तिची मीनाआजी तिच्याकडून 'दिव्यादिव्या दिपत्कार' म्हणवून घेत असे.
सिंबॉयसिसच्या प्राथमिक शाळेत असतांना ती नेहमीच 'ए' ग्रेड मिळवत असे. पुढे काय झालं कुणास ठाऊक? 'आळस' नावाचा कली
तिच्या अंगात शिरला. विंदा करंदीकरांची एक तीन ओळींची कविता आहे -
कंटाळा आला की काय होते?
मग कंऽऽटाळा येतो
मग कंऽऽटाळा येतो '
तसंच तिचं झालं. बुध्दी असूनही तिला लिहिण्याचा कंटाळा येऊ लागला आणि अभ्यासातील तिची प्रगती थांबली. मात्र कॉम्प्युटर या
विषयात तिला आम्हा सर्वांपेक्षा गती आहे. मामाला 'मेल' पाठवणं , कॉम्प्युटरवर चॅट करणं या सगळया गोष्टी ती आनंदाने करते.
ईशानंतर दोन वर्षांनी २३ नोव्हेंबर १९९३ या दिवशी स्निग्धाचा जन्म झाला. स्निग्धाची आई 'राणी' उर्फ कौरोबी ही बंगाली
असल्यामुळे आणि कौरोबीचे आई वडील भागीरथी भवन मध्ये शेजारीच राहत असल्यामुळे लहानपणापासून स्निग्धावर बंगाली आणि
मराठी या दोन्ही भाषांचे संस्कार झाले होते. तिला बंगाली भाषा चांगली कळत असे; मात्र तिच्याशी कोणी बंगाली बोललं की त्याचं
उत्तर मात्र ती मराठीत देत असे. पुढे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्यानंतर ते उत्तर इंग्रजीत येऊ लागलं. तीन वर्षाची झाल्यापासून
डोक्यावर चुन्नी घेऊन ती आई बनत असे. तर कधी हातात छडी घेऊन समोर नसलेल्या विद्यार्थ्यांसमोर तिच्या बाईंची नक्कल होत
असे. कुठल्याही गाण्यावर तिनेच बसवलेल्या स्टेप्सच्या नृत्याने ती आम्हांला थक्क करून सोडत असे. गेल्या दोन वर्षापासून सचिन
आणि राणी नोकरीनिमित्त कॅनडात टोरांटोला स्थायिक झाल्यामुळे स्निग्धाचा कुठलाही एकपात्री (किंबहुना बहुरूपी) कार्यक्रम
पाहण्याचा आमचा आनंद इंटरनेट वरच्या तिच्या
दर्शनावर आम्हांला भागवून घ्यावा लागतो. कधी कधी वेब कॅमेऱ्यासमोर तिचा
फॅशन शो चालू असतो. नवीन घेतलेला फ्रॉक, जीन्स शर्ट , सलवार खमीस घालून दाखवणं आणि लगेच तो काढून दुसरा चढवणं सुरू असतं.
स्निग्धानंतर सुमारे दोन वर्षांनी, म्हणजेच ईशानंतर पाच वर्षांनी ५ जून १९९६ रोजी जन्माला आलेला 'जनित' हा जन्मत:च प्रचंड
ऊर्जा घेऊन जन्माला आला. त्याची आई त्याला 'जनित्र' अशीच हाक मारते. त्याचं प्रत्येक विषयातील कुतूहल आणि स्मरणशक्ती थक्क
करणारी आहे. 'आबू' अशी हाक मारून, "तुम्हाला माहीत आहे का?" असा प्रश्न त्यानं विचारला की पु.लं. नी लिहिल्याप्रमाणे आपण
'एक नापास आजोबा' होणार याची खात्री पटत असे. ईशाप्रमाणे त्यालाही घेऊन मी सुनीताबाईंकडे जात असे आणि 'माईआजी' कडून
बेदाणे वसूल केल्याशिवाय त्याचा तिथला मुक्काम हलत नसे.
डिक्टेशनमध्ये किंवा गणितात एखादा जरी गुण कमी मिळाला की तो अस्वस्थ होतो. पैकीच्या पैकी हा त्याचा मानबिंदू आहे. मूलत:
तो शांत स्वभावाचा त्यामुळे शाळेतून त्याच्याबद्दल घरी तक्रार तर कधी आलीच नाही. उलट एका वर्ग शिक्षिकेने सुप्रियाला हा मुलगा
मला देऊन टाक, असंच सांगितलं. स्वत: तो शांत स्वभावाचा असला तरी शाळेत दंगामस्ती करणारा त्याच्या वर्गातील 'नील गद्रे'
त्याचा हीरो आहे. शाळेत लवकर पोहोचून वर्गात दप्तर टाकून वाळूच्या पिटमध्ये उडया मारणं हा त्याचा आवडता छंद असे. त्यामुळेच
अभ्यासाप्रमाणेच खेळांचीही आवड त्याला उपजतच आहे. फूटबॉलमध्ये त्याचा डॅडी त्याचा आदर्श आहे. बी.एम.सी.सी.च्या फूटबॉलचं
ग्राऊंड चुकवणं त्याच्या अगदी जिवावर येतं. त्याला अपवाद, मी कधी परांजपे यांच्या 'अथश्री' मध्ये जायला निघेन तेव्हा. अशावेळी
'मन इकडे वपु तिकडे' अशी त्याची मन:स्थिती होते. फूटबॉलमध्ये त्याच्या सरांनी त्याला अपकमिंग प्लेअर म्हणून पेला बक्षीस दिला
तेव्हा आपण जणू काही 'पेले' असल्याचा त्याला आनंद झाला.
फूटबॉल इतकाच क्रिकेट त्याच्या अत्यंत आवडीचा खेळ. त्यामुळे आताशा त्याची आई 'जॉटी ऱ्होडस्' अशाही नावाने त्याला हाक
मारते. 'वर्ल्ड कप' ची मॅच झाल्यापासून आमच्या घरात त्याचे एकट्याचेच तिरंगी सामने चालू असतात. घरातल्या बॉक्सचे स्टंप करून
त्याने मैदानावरील चौकाराच्या, षटकारांच्या जागा ठरवून ठेवलेल्या असतात आणि इंडिया पाकिस्तान, इंडिया न्यूझीलंड, इंडिया
ऑस्ट्रेलिया असे सामने सतत चालू असतात. या नाटकात तो पूर्ण रंगलेला असतो. एखाद्या रंगभूमीवरच्या कसलेल्या नटालाही त्याची
तन्मयता साधेल की नाही याची शंका वाटावी. अधूनमधून मी त्याला स्कोअर विचारतो आणि तितक्याच गंभीरतेने तो ऑस्ट्रेलियाचे
तीन आऊट १०७ किंवा १८० असा स्कोअर सांगतो. त्यात 'गिलख्रिस्ट' अजून खेळतो आणि त्याची 'हाफ सेंचुरी' झाली आहे हे
सांगायला तो विसरत नाही. सगळया टीमच्या प्लेअर्सची नावे त्याला पाठ असतात. दहा वेळा सांगूनही ती माझ्या लक्षात राहत
नाहीत. कधी कधी आम्हांला धास्ती
वाटते, तो एकटाच स्वत:शी बोलत कॉम्प्युटरवर बुद्धिबळाचा खेळ खेळत राहतो तेव्हा!
जनितनंतर ३० मे १९९९ ला चारी नातवंडातील शेंडेंफळ युवराज करण जन्माला आले. त्याच्या जन्मकुंडलीतच परदेशगमनाचा योग
असावा. कारण ते जन्माला आल्यानंतर थोड्यांच दिवसांत त्याच्या आईने परदेशातील नोकरीसाठी खटपट सुरू केली. ती टाटा सोशल
सायन्स इन्स्टिटयूटची एम.एस.डब्ल्यू. असल्यामुळे तिला परदेशातील नोकरीची खात्री होती आणि तसंच घडलं. सचिन आणि राणी
दोघांनाही भागीरथी भवन वातावरणातून मुलांना लवकर बाहेर काढायचं होतं. ग्रॅंट रोडच्या शाळेच्या तुलनेने टोरांटोला दोन्ही
मुलांची प्रगती त्यांच्या अपेक्षेपेक्षा उत्तम झाली. दोघांनाही 'बेस्ट स्टुडंट अवॉर्ड' पहिल्याच वर्षी मिळालं. 'बाबा' हे करणचं दैवत होतं.
त्यामुळे बाबा कधी रागावला की त्याला भयंकर रडू येत असे आणि रडता रडता 'बाबा ! मी गुड बॉय आहे ना?' असा त्याचा प्रश्न असे.
सध्या तो स्पायडरमॅन या भूमिकेत राहतो; आणि एका गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर उडया मारण्याच्या स्पायडरमॅनच्या भराऱ्या तो
खुर्चीवरून गादीवर उडया मारून भागवून घेतो. आईसंबंधी तो खूप पझेसिव आहे. अगदी लहानपणी आईच्या शेजारी बाबा
झोपलेलासुध्दा त्याला आवडत नसे. त्याने बाबाला विचारलेल्या एका प्रश्नाने तर आम्हा सर्वांची हसून हसून मुरकुंडीच वळली. त्याने
बाबाला विचारलं, 'तू आईशी लग्न का केलंस? मी तिच्याशी लग्न करणार होतो!' Innocence is Bliss हेच खरं.
अनेक वेळा आमच्या दैवाचा आम्हांला हेवा वाटतो. अशी चार गुणी नातवंडं. त्यांचं दोन्हीकडचं आजोळ शेजारी शेजारी. मुलांच्या
विकासाला वाव देणाऱ्या शाळा आणि नातवंडांवर माया करणारे प्रेमळ शिक्षक. सुखी आयुष्य, सुखी आयुष्य यापेक्षा अधिक काय
असतं?
-मधू गानू
|