| झांजेतला थिरकवाँ
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, उत्तम संगीतकार, दिग्दर्शक,
जाणकार रसिक आणि उत्तम श्रोता, श्रोत्यांशी संवाद साधणारा उत्तम
वक्ता अशी कितीतरी विशेषणे रसिकांनी पु.लं.ना दिली. एकाच वेळी
अनेक क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल अशी उत्तम कामगिरी करणारे ते एकमेव
म्हटले पाहिजेत. या सर्वात पु.लं.चा महत्वाचा गुण किंवा छंदच तो
म्हणजे माणसे जोडण्याचा. निरनिराळ्या क्षेत्रातली आणि वेगवेगळ्या
वयोगटातली माणसं पु.लं.च्या गणगोतात सामिल झाली होती. या सगळ्यांपैकी
ज्यांना पु.लं.चा प्रत्यक्ष सहवास लाभला किंवा पु.लं.बरोबर प्रत्यक्ष
रंगमंचावर, आकाशवाणीवर किंवा दूरचित्रवाणीवर सहभागी होता आले ते
भाग्यवंतच म्हटले पाहिजेत. पु.लं.ची कुठलीही कलाकृती प्रत्यक्ष
पाहण्याची किंवा त्यांना ऐकण्याची संधी आमच्या पिढीला मिळाली नाही.
पण वेबसाईटच्या निमित्ताने त्या आठवणी जिवंत करणाऱ्या कितीतरी
ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांना भेटण्याची संधी मात्र मला मिळाली.
अशाच काही भाग्यवंतांपैकी म्हणजेच काही काळ पु.लं.चे रंगमंचावरील
सहकलाकार असलेल्यांपैकी एक म्हणजेच `रविवारच्या सकाळ` मधला `रामा
गडी`, `अंमलदार` मधला `हरभट` किंवा वाले कदम म्हणजेच `मधू कदम`.
व्यक्तिरेखा किंवा पात्रांची अचूक निवड हा पु.लं.चा आणखी एक
विशेष गुण. सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तिमधील वैशिष्टय,
गुण, लकबी पु.ल. अचूक हेरत आणि अगदी नेमक्या ठिकाणी ते त्या
पात्राची निवड करुन त्या वैशिष्ट्यांचा उपयोग करुन घेत. याचे
उत्तम उदाहरण म्हणजे रामा गडी. आवाजात असलेला नैसर्गिक हलकासा
चिरकेपणा, खट्याळ हावभाव आणि उत्तम अभिनय याचा पुरेपूर उपयोग
केल्यामुळे रामा गडी आजही रसिकांच्या लक्षात आहे तो त्याच्या
हैलूऽऽऽ मुळेच.
वाऱ्यावरच्या वरातीत प्रसंगानुरुप आलेले किंवा दोन प्रसंगांच्या
मध्ये असलेले संगीत यामुळे ते संपूर्ण प्रहसन सूर आणि तालाच्या
एका विशिष्ट लयीत डोलते आहे असे मला स्वत:ला नेहमी जाणवते. त्या
तालाचा आणि सूराचा वापर सुद्धा कसा मर्यादित कि त्याचे असणे
प्रेक्षकांना मुद्दामहून जाणवत नाही. पण त्यानी दोन प्रसंगांमधली
लय मात्र साधली जाते. पु.लं.च्या लेखन, दिग्दर्शनातले हे कसबच
म्हणायला हवे. आणि ही लय सांभाळण्याचे श्रेय फक्त दोन व्यक्तींना
जाते. ढोलकीवाले बापू देशमुख आणि झांजवाले मधू कदम. मला त्या
दोघांची जुगलबंदी इतकी आवडते कि मी अनेकदा फक्त तेवढेच क्लिपिंग
सीडीवर बघत असते. इतक्या सहजतेने मधू काकांनी ती लय सांभाळली
आहे की लाजवाब! पु.लं. सारख्या जाणकाराकडून मग सहज दाद निघून
जाते,"झांजेतला थिरकवाँ'!!
थिरकवाँसारख्या महान तबलावादकाच्या हातात असलेली लय मधुकाकांच्या
झांजेतही तितकीच मुरली आहे. उत्स्फुर्ततेपणे त्यांना अशी दाद
देणारे पु.ल. सच्च्या कलावंताला भरभरुन दाद देणारे खरोखरच जाणकार
रसिक होते.
"प्रत्यक्ष पु.लं. कडुन अशी दाद मिळाल्यानंतर आम्हाला
आणखी कुठल्याच मानसन्मानाची, पुरस्काराची गरज नव्हती" असे
म्हणणारे मधुकाका आजही वरातीची आठवण निघाली की टाइम मशीन लावल्याप्रमाणे
क्षणात अनेक वर्षे मागे जातात. आज ७९ व्या वर्षी त्यांना 'वरातीतला'
प्रत्येक प्रसंग, संवाद सहज आठवतो. प्रत्येक व्यक्तिरेखा तिच्या
बारकाव्यांसह ते आजही सहज जिवंत करतांना मी अनेकदा पाहिले ऐकले
आहेत आहेत. तसेच पु.लं.च्या दिग्दर्शनातील बारकावे, सहजता, त्यावेळचे
वातावरण, पु.लं.च्या उपस्थितीमुळे आलेले चैतन्य, त्याबरोबरच
सुनिताबाईंची शिस्त पण नेटकेपणा याच्याही अनेक आठवणी ऐकल्या
आहेत. पु.लं.चे त्यांच्या या सगळ्या सहकाऱ्यांशी संबंध फ़क्त
सहकलाकार म्हणून नव्हते, तर सगळ्यांना अगदी घरच्यासारखी वागणूक
असे." अनेक सुखदु:खाच्या काळात भाईनी मला मोलाचे मार्गदर्शन
आणि सगळ्या प्रकारे सहाय्य केले आहे." असे मधुकाका आवर्जून
सांगतात.
काल ८ नोव्हेंबरच्या निमित्ताने पुन्हा त्यांची भेट घेतली.
दरवेळच्या जुन्या आठवणी आणि नेहमीप्रमाणे काही नवीन आठवणींची
भर म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच. काल मधू काकांनी शेवटचे वाक्य
म्हटले, "भाईचा माझ्यावर वरदहस्त होता." खरंतर आपल्या
कलाकृतीतून आजच्या पिढीलाही अपार आनंद देणाऱ्या पु.लं.चा आपल्या
सारख्या सगळ्याच रसिकांवर आणि चाहत्यांवर वरदहस्तच होता. पु.लं.च्या
आठवणीत आणि मधू काकांच्या सहवासात माझी दिवाळी ख्ऱ्या अर्थानी
काल साजरी झाली !
- स्मिता मनोहर
|