|
मधू भाऊ- दिलीप प्रभावळकर
मधू गानूं बद्दलच्या आठवणी, भावना, प्रत्येक भेटीत अगदी न भेटतां सुध्दा
घट्ट होत गेलेलं नातं हे खूप व्यक्तिगत स्वरुपाचं आहे. ते लिहून दाखवणं, कागदावर मांडता येणं खरंच फार कठीण आहे.
मधूभाऊ होते आणि सगळं सुरळीत होतं. सुरक्षित वाटण्याजोगं होतं. हा माणूस किती तऱ्हेने आधार द्यायचा, सल्ला द्यायचा, अडचणी
दूर करायचा, मदतीला यायचा, हे आता आठवलं की ते गेल्यामुळे निर्माण झालेली पोकळी किती मोठी आहे ह्याची जाणीव होते.
ते जवळचे झाले चवदा-पंधरा वर्षांपूर्वी. माझ्या कुठल्याशा नाटकानंतर (बहुधा हसवा फसवी) मला भेटून त्यांनी प्रेम व्यक्त केलं होतं.
अकृत्रिम जिव्हाळा दाखवला होता. त्यानंतर कलम ३०२ या माझ्या नाटकाच्या प्रयोगाला मी पुन्हा एकदा पुण्यात आलो. (त्यांच्या
घरापासून आमचं घर जवळ.) मला कंबरेला माकडहाडाकडे मार लागला होता. नाटकात पडण्याचा प्रसंग होता आणि त्यामुळे
चालताच येत नव्हतं. पुण्याला रात्री प्रयोग होता. माजगावकरांबरोबर मधूभाऊ आले. डॉ. निगुडकरांना घरी बोलावलं. मला झोपवून
ठेवलं होतं. थोड्या वेळाने मधूभाऊ छोट्याशा टिफिनमधून माझ्यासाठी जेवण घेऊन आले. घरचं आहे, साधं आहे असं म्हणत मला
जेवायला लावलं. हे त्यांनी आग्रहाने दिलेलं मीनाक्षीताई गानूंच्या हातचं पहिलं जेवण! त्यानंतर त्यांच्याकडे मधूभाऊंच्या गप्पा ऐकत,
त्यांच्या शेजारी बसून मी किती वेळा जेवलो याला गणतीच नाही. गप्पांमध्ये किती किस्से, किती आठवणी, किती अनुभवाचे बोल...
पुलंच्या 'बटाटयाची चाळ', 'वाऱ्यावरची वरात'चे अत्यंत रंजक असे अनंत
किस्से मी ऐकले. पुलंच्या सहवासातल्या कितीतरी आठवणी,
त्यांच्याबरोबर केलेले
प्रवास, कुमार गंधर्व, भीमसेन यांच्या मैफली याबद्दल भरभरुन ऐकलं. कधी दत्ताभटांबद्दल, कधी भक्ती
बर्वेबद्दल, तेंडुलकरांबद्दल, श्री.ना.पेंडसे-, शांता शेळके-, जयवंत दळवींबद्दल, या सगळयांतून दिसायचा त्यांचा जिव्हाळा, या
साऱ्यांवरचा
लोभ! त्यांचं सुसंस्कारित, सुसंस्कृत मन दिसायचं. त्यांचा बहुश्रुत असण्याचा,
अनुभवसंपन्न असण्याचा प्रत्यय यायचा.
वेगवेगळया प्रकृतीच्या, प्रवृत्तीच्या मोठ्या लेखकांना, कलाकारांना अत्यंत जवळचा असलेला हा एकमेव माणूस होता! त्यांच्या अत्यंत आग्रहाच्या आमंत्रणावरून मीनाक्षीताईंच्या हातचं सुग्रास जेवण जेवून गेलेले कितीतरी लोक होते. लेखक, कलाकार, कलाप्रेमी, सगे,
सोयरे, मित्र, मित्रांचे मित्र. जेवणाच्या आमंत्रणाला काहीही निमित्त असायचं किंवा काहीच नसायचं. फक्त सहवासाचा आनंद.
लिहितांना, वाचतांना एखादा शब्द अडला, एखाद्याचा फोन नंबर हवा असेल, काही माहिती हवी असेल, संदर्भ हवा असेल तर
आपोआप मुंबईहून मधूभाऊंचा पुण्याचा फोन नंबर फिरवला जायचा. सर्व प्रकारची मदत, विविध बाबींवरचं मार्गदर्शन मिळण्याचं ते केंद्रच होतं!
... खूप आठवणी आहेत. त्यांचा स्वभाव दाखवणाऱ्या.
- अचानक पाऊस आला म्हणून मला छत्रीतून घरी पोहचवणारे आणि मग ती छत्री माझ्यासाठी ठेऊन 'आता पाऊस कमी झाला'
म्हणून स्वत: भिजत जाणारे मधूभाऊ.
-आग्रह करकरून, पुन:पुन्हा फोन करुन जेवायला, ब्रेकफास्टला बोलवणारे.
-सिंध कॉलनीत राहायला गेले होते तेव्हां त्यांना भेटायला गेलं की परत येतांना रिक्षानं सोडायला येणारे. 'नाहीतरी माझं इथं काम होतंच' म्हणणारे, का तर भेटायला
येणाऱ्याला रिक्षाचा खर्च होऊ नये म्हणून !
गेल्या वर्षी गोव्याला माझा सत्कार झाला. 'आशय सांस्कृतिक आणि गोव्याच्या 'सिफ डिग्राशिया' यांनी दोन दिवस टॉक शो आणि मुलाखतीचा कार्यक्रम ठेवला होता. द. मा.
मिरासदारांच्या हस्ते मला मानपत्र दिलं गेलं. खूप गर्दी होती. मला त्याचा आनंद झाला, पण त्याच्यापेक्षा जास्त आनंद हा सन्मान पाहायला आपलं जवळचं माणूस म्हणून
मधूभाऊ आलेत हा होता. डोळयांत पाणी आलेला त्यांचा हसणारा चेहरा पाहून कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.
मधूभाऊ गेले तेव्हां मी दूर राजस्थानात होतो. सुप्रियाचा- त्यांच्या मुलीचा- पहाटे फोन
आला. तिच्या नवऱ्याचा- जितेनचा- मेसेज
आला. मला काही कळत नव्हतं. हे स्वीकारायला मन तयार नव्हतं. मला वाटलं होतं, आम्ही असेपर्यंत मधूभाऊ असणार
आहेत. आधाराला, सल्ल्याला, आम्हाला आनंद द्यायला...
मला त्यांचं अंत्यदर्शन घेता आलं नाही. वाटत राहिलं, त्यांच्यासाठी खूप काही करायचं राहून गेलं. त्यांची थोडी तरी सेवा करायला हवी होती. पण, अंत्यदर्शन झालं नाही ते एका अर्थी बरंच झालं. आयुष्यभर दुसऱ्यांसाठी धावपळ करणाऱ्या मधूभाऊंना असं
निश्चल अवस्थेत पाहवलं नसतं. हे त्यांचं रुप अगदीच अपरिचित आणि अनोळखी होतं.
त्यांच्या पंच्याहत्तरीला त्यांना भेट द्यावी म्हणून त्यांच्यासाठी आणि त्यांचे आप्त, मित्र, जवळचे, यांच्यासाठी मी माझा स्टॅंडअप टॉक
शो केला. 'मुखवटे आणि चेहरे'. गेल्यावर्षी २ एप्रिल २००४. कार्यक्रम संपल्यावर मी मनातलं सांगावसं वाटलं म्हणून चार वाक्य बोललो. ती अशी होती-
"आजचा हा माझा कार्यक्रम खास आमच्या मधूभाऊंसाठी होता. त्यांनी एवढं काही आमच्यासाठी केलं आहे, सतत करत असतात की त्याची परतफेड करणं शक्य नाही.
पण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा शो करायचा होता.
अगदी व्यक्तिगत सांगायचं तर माझ्यासाठी ते खूप काही आहेत. ते मित्र वाटतात, वडील वाटतात, वडील भाऊ वाटतात. गाईड, फ्रेंड, फिलॉसॉफर आहेत. ज्यांचा मानसिक , नैतिक आधार वाटावा असे आहेत आणि याहीपेक्षा जास्त म्हणजे माझ्यात - माझ्यातच का,
आपणा सर्वांच्यात, थोडा बहुत किंवा अंशत: असलेला भलेपणा मधूभाऊंमधे पूर्ण रुपाने दिसतो. माणसांवर निरपेक्षपणे प्रेम कसं करावं हे त्यांच्याकडून शिकायला मिळतं. मधूभाऊ, शतायुषी व्हा ! तुम्हाला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभू दे- अशी आपणा
सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो."
... आमची प्रार्थना कमी पडली.
- दिलीप प्रभावळकर.
|