| अब्द अब्द मनी येते- मधू गानू
आज ८ नोव्हेंबर. भाईंचा (पु. ल. देशपांडे यांचा) जन्मदिवस. महाराष्ट्राच्या कुंडलीतली भाग्यतिथी. आज गेल्या चाळीस वर्षातल्या
त्यांच्या अनेक वाढदिवसांच्या आठवणींनी मनात गर्दी केली आहे. खास करून त्यांचा पन्नासाव्या, साठाव्या, पंचाहत्तरावा आणि ८०
वा वाढदिवस. त्यांचा ५० वा वाढदिवस सुनीतावहिनींनी भाईंच्या 'बटाटयाची चाळ' या कार्यक्रमाचा प्रयोग लावून साजरा केला.
शिवाय सामाजिक कार्यासाठी दिलेल्या मोठया देणग्यांपैकी, पहिल्या मोठ्या देणगीचा संकल्प या निमित्तानं सोडला गेला. अंध
मुलांना मराठीतलं उत्तम वाङ्मय वाचायला मिळावं म्हणून ब्रेल लिपीत अशी पुस्तकं निर्माण करण्यासाठी पहिली देणगी दिली गेली.
चांगल्या कार्यासाठी देणगी देण्याचा हा संकल्प आजही सुरूच आहे. ६० व्या वाढिदवसाला पुण्यात 'रुपाली'मध्ये जत्रा लोटली होती.
कुठून कुठून माणसं येत होती. पहाटेपासून फोन खणखणत होता. पुष्पगुच्छांची, पुष्पहारांची हॉलमध्ये आरास मांडली गेली होती.
रवींद्रनाथ आणि चार्ली चॅपलीन या दोन चित्रांमध्ये, मोडयावर बसून फोन घेत असलेल्या भाईंचं चित्र अजूनही डोळयांसमोर आहे.
वाढदिवसाच्या निमित्तानं पं. मल्लिकार्जुन मन्सूर धारवाडहून आदल्याच दिवशी पहाटे ३ || वाजता रूपालीत येऊन पोहोचले होते.
त्याच मंगल प्रभाती मन्सुरांच्या सुरांनी भाईंच्या वाढिदवसाच्या सोहळयाची सुरूवात झाली.
७५ व्या आणि ८० व्या वाढदिवसांच्या काळात भाई पार्किन्सनच्या व्याधीनं त्रस्त होते. केवळ लोकांचा विरस होऊ नये एवढयाच
हेतूनं ते समारंभात सामील झाले होते. ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिलीप माजगांवकरांनी 'राजहंस प्रकाशन' तर्फे भाईंच्या
संपूर्ण वाङ्मयीन, कलात्मक कर्तुत्वाचा परामर्श घेणारा 'अमृतिसद्धी' हा ग्रंथ दोन खंडांत प्रसिद्ध करण्याचा संकल्प सोडला होता. हा
संकल्प एक वर्ष उशीरा - ८ नोव्हेंबर १९९५ ला सिद्धीस गेला. 'पु. ल. ७५' ही देखणी स्मरणिका मात्र ७५ व्या वाढदिवसाला प्रसिद्ध
झाली. शिवाय जयंत साळगांवकर, बाबुराव अडारकर आदींच्या पुढाकारानं मुंबईला राजा शिवछत्रपती विद्यालयाच्या पटांगणावर
भाईंचा अमृतमहोत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा झाला. भाईंचा ८० वा वाढदिवस जणुकाही सर्व वाढदिवसांचा सांगता समारंभ
ठरावा असाच योजिला गेला. प्रकृती साथ देत नव्हती तरी या वाढिदवसाला भाई आपल्यात होते. भाई आपल्यात नसलेला आज
त्यांचा दुसरा जन्मदिवस. पण भाई आपल्यात नाहीत असं तरी कसं म्हणून अजूनही अनेक रूपांनी ते आपल्याला भेटतातच. कधी
पुस्तकांतून, कधी कॅसेट्समधून त्यांचा आवाज कानी येतो. कधी एखाद्या चित्रपटांतून त्यांचं दर्शन घडतं. ध्वनीचित्रफति,
(cassettes) हा तर भाईंना पाहण्याचा आणि ऐकण्याचा आमचा हक्काचा 'तिळा उघड' मंत्र. १२ जून २००० नंतर महाराष्ट्रात असा
एकही दिवस गेला नसेल की ज्या दिवशी त्यांचं नामस्मरण झालं नाही. गुणसंकीर्तन घडलं नाही. 'कुणी गोविंद घ्या | कुणी गोपाळ
घ्या' या तालावर हजारो अंत:करणं त्यांच्या स्मृती जोजावीत आहेत. एवढं सगळं असलं तरी एकच खंत मनात दाटून येते की, ही
त्यांची सारी रूपं अपार्थिव आहेत. यापुढे कुणाच्या पाठीवर त्यांचा शाबासकीचा हात फिरणार नाही. कुणी नवोदत कलावंत त्यांच्या
पायाला स्पर्श करून पुढच्या आयुष्याची दिशा ठरवू शकणार नाही आणि माझ्यासारख्याला त्यांचे पाय चेपत असताना मिळणाऱ्या
श्रवणभक्तीच्या मोठ्या आनंदाला मुकावं लागलं आहे. भाईंना पाय चेपून घेणं आवडत असे. तसे थोडेफार स्वत:चे लाड करून घेणंही
आवडत असे. सुनीता वहिनींनी त्यांचे सगळे लाड पुरविले. जिभेचे तर अधिकच. त्या स्वत: उत्तम सुगरण आहेत. मला वाटतं, भाईंच्या
'माझे खाद्यजीवन' या लेखाला सुनीतावाहिनींच्या सुरूवातीच्या स्वयंपाकाचीच प्रेरणा असावी. सुनीतावहिनींनी भाईंचे सगळे लाड
पुरवले तरी मनाचे लाड होऊ दिले नाहीत. त्यांना ऐश्वर्यात लोळत ठेवलं नाही. उलट, त्यांच्या सर्जनशीलतेला आव्हानं देणारे नवेनवे
उपक्रम त्यांच्यासमोर ठेवले. 'बटाटयाच्या चाळी'चे प्रयोग तुफान चालले होते. परंतु ५० व्या प्रयोगानंतर नवीन कार्यक्रम रंगमंचावर
येईपर्यंत 'चाळीचा' प्रयोग करायचा नाही, ही अट त्यांनी भाईंना घातली. यातूनच 'वाऱ्यावरची वरात' (पु. ल. देशपांडे सहकुटुंब
सहपरिवार) हा कार्यक्रम जन्माला आला. याच पद्वतीनं पुन्हा एकदा बहुरूपी कार्यक्रम 'असा मी असामी' रंगमंचावर आला.
भाई पलंगावर आडवे झालेले असले आणि मी शेजारी बसलो की ते पाय पुढे करीत. हा आमचा अलिखित संकेत होता. त्यांचे पाय
चेपता चेपता त्यांच्याकडून ऐकलेल्या अनेक विषयांवरच्या आठवणींनी माझं आयुष्य संपन्न होत असे. त्यांच्या आवडीचा मुख्य विषय
'पार्ले' आणि तिथली कसल्या ना कसल्या वेडानं झपाटलेली माणसं. दादासाहेब पारधी, बाबुराव परांजपे, त्यांचे आजोबा 'ऋग्वेदी',
फणसळकर मास्तर अशी अनेक. माझंही बरीच वर्षे वास्तव्य पार्ल्यालाच होतं. त्यामुळे संदर्भही जुळत. 'मास्तर नसलेले फणसळकर
मास्तर' ही व्यक्तिरेखा लिहून त्यांनी फणसळकर मास्तरांनाच नव्हे तर पर्यायानं पार्ले गावालाच चिरंजीव केलं आहे. कधी या गप्पात
'व्यक्ति आणि वल्ली' मधल्या मूळ व्यक्तीची जिज्ञासा पुरी होत असे. एकदा त्यांनी 'हरितात्या' या व्यक्तिरेखेची जन्मकथा सांगितली.
भाईंच्या पार्ल्याच्या घरी 'बारोट' नावाचे एक गुजराथी गृहस्थ गणपतीच्या दिवसांत आरत्या म्हणायला येत असत. 'हरितात्या' या
व्यक्तिरेखेचे बाह्य वर्णन या 'बारोट' गृहस्थावर बेतलेलं- मांजरपाटाची पैरण, पंचा आणि डोक्याला मळकट टोपी. नाकाची पूर्व धरून
दक्षिणोत्तर टोपी घालायचे. हरितात्या कुठल्या गोष्टीत तल्लीन झाले की, त्यांचा एक डोळा कमालीचा तिरळा व्हायचा. या
बाह्यांगाचं अंतरंग मात्र 'चांदोरकर' या इतिहास संशोधकाचं इतिहासप्रेम हे होतं. या दोन्हीच्या मिश्रणातून 'हरितात्या' हे लोभस
रसायन तयार झालं होतं. 'चितळे मास्तर' हीसुद्वा दोन शिक्षकांच्या स्वभाववैशिष्टयांतून झालेली ह्र्द्य व्यक्तिरेखा. या गप्पांच्या नादात
फार वेळ गेला की वहिनी आतून 'अरे मधूला आता पुरे म्हणून सांग!' असं भाईंना ओरडून आम्हां दोघांना आनंदसमाधीतून जागं करीत
असत. भाई मर्मज्ञ तर होतेच पण उत्स्फूर्तता हा त्यांचा खास स्वभाविवशेष. त्याचे अनेक किस्से प्रसिद्व झालेले आहेत. एकदा भाई
पनवेलजवळच्या रासायनीत गेले होते. तिथल्या डॉ. कसबेकरांनी नवीनच बांधलेल्या शंकराच्या देवळाला नाव सुचवायला सांगितलं.
भाईंनी एका क्षणात 'रसेश्वर' असं त्या मंदिराचं नामकरण करून टाकलं. भाईंच्या अशा अनेक आठवणी संपणार नाहीत. ग. दि.
माडगूळकरांनी पूर्वी एका दिवाळी अंकाच्या लेखात लिहिलं होतं- 'माणसाला किर्ती तर कधीच त्याच्या आयुष्यात मिळत नाही.
मिळतं ते थोडंबहुत नाव. तेही कालौघात वाहून जातं. सुदैवानं गदिमा आणि भाई दोघांनाही त्यांच्या जिवंतपणीच दिगंत किर्ति
मिळाली. मृत्यूनंतरही ती वर्धिष्णूच आहे.
-मधू गानू. ('सहवास गुणीजनांचा')
|